परतीचा फराळ
*परतीचा फराळ!*
परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा ...!
घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात. *मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो.* निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत, तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.
ओल्या नारळाच्या करंज्या *एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं* तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात.
चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो. पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर *डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी* असं माझं मत आहे.
*पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो.* कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.
*प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते.* ती गृहीणींना अचूक माहीती असते. इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते. पण *त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.*
डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो. कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.
जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. *मिसळीचा बेत आखला जातो.*
शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही. तो संपतो, पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.
असा हा *'परतीचा फराळ' दिवाळीच्या आठवणींचा... रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा...* जिभेवर रेंगाळणा-या चवीचा... जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा... गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा...आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा ...
*तर मग एन्जॉय तुमचा परतीचा फराळ!*

Comments
Post a Comment