Posts

Showing posts from July, 2025

एक वृक्ष - कविता

Image
  काल वडाने,आपट्याला विचारलं, दुखतंय का रे जास्त..? तुझ्याही फांद्या, तुझीही पानं, माणसाने केली ना ध्वस्त... वर्षातून एक दिवस, म्हणे आपला असतो मान, कुणी विचार करतो का, आपल्यातही असतो प्राण... त्यांचा उत्सव साजरा होतो, आपली म्हणे होते पूजा, त्यांना कुठे कळतेय मित्रा, आपल्याला होणारी ईजा.. पूर्वी बांधायचे दोर वडाला, आता फांद्या तोडून नेतात, लचके तोडून त्याच वडाला, काय तर म्हणे देव म्हणतात.. गरजेपेक्षा जास्त किती, तोडतात फांद्या नी पाने, निर्जीव झालेल्या पानांना, मग म्हटलं जातं "सोने" दुसऱ्याच दिवशी सोन्याचा, फक्त पालापाचोळा होतो, कालचा देव आज मात्र, पायदळी तुडवला जातो... कसली म्हणायची श्रद्धा ही, कसली रे पही भक्ती, स्वतःला नी निसर्गाला, फसवायचीच ही युक्ती... विरोध नाही आमचा कुठल्या, चाली रीती प्रथांना, पण बघवत नाही निसर्गाचा, ऱ्हास उगा होताना आपण कधी स्वतःला, देव म्हणवून घेत नाही, खूप आहेत दुःख आपली, पण बोलता येत नाही... आपण देतोय भरभरून, त्यांनी गरजेपुरतंच घ्यावं, सण साजरे करावे पण, आम्हालाही जगू द्यावं... - एक वृक्ष