शिक्षण बदलते आहे.....
जागतिकीकरण सुरू झाले आणि अचानकपणे भारतातल्या पोरी सुंदर असल्याचा साक्षात्कार जगाला होऊ लागला! ‘मिस वर्ल्ड’ काय, ‘मिस युनिव्हर्स’ काय, भारतीय मुली डोक्यावरचा मुकुट मिरवू लागल्या. भारतातल्या कन्या सुंदर असल्याचा साक्षात्कार होण्याचे मुख्य कारण होते, भारताची बाजारपेठ. जगाची एकपंचमांश लोकसंख्या भारतात राहते. सौंदर्याची मोठी बाजारपेठ इथे उभी राहू शकते!
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
*https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*
👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*
*`सौजन्य व संकलन `*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
तसेच आता भारतातल्या शाळा आणि भारतातले काही शिक्षक जागतिक दर्जाचे आहेत, असा साक्षात्कार जगाला होऊ लागला आहे. ज्या शिक्षकांची शिक्षणविषयक मांडणी सामान्य आहे, शिक्षक म्हणून त्यांनी काही फार मोठे योगदान दिलेले नाही, अशा शिक्षकांना अचानक डॉलर्समध्ये मोठे पुरस्कार मिळू लागले आहेत. ते शिक्षक फार मोठे काम करत आहेत, असे नाही. शिक्षणाच्या अनुषंगाने भारताएवढी मोठी बाजारपेठ जगात कुठेच नाही, हे खरे कारण. भारताची लोकसंख्या महाकाय. त्यात तरुणांची लोकसंख्या सर्वाधिक. शिकू पाहणाऱ्या मुला-मुलींची संख्या जगात सर्वात जास्त. ही बाजारपेठ जगातल्या धनदांडग्या कंपन्यांना खुणावते आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान भारतात आल्यानंतर हेडलाइन होते ती, शिक्षण क्षेत्रातील करारांची. इंग्लंडमधील विद्यापीठांचे कॅम्पस आता भारतात सुरू होणार, अशा बातम्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकतात. पूर्वी असे होत नव्हते. साधारणपणे लष्करी करार, व्यापार विषयक करार अशा प्रकारच्या बातम्या उमटत. आता मात्र ती जागा शिक्षणविषयक बातमीने घेतलेली आहे. स्टार्मर यांच्या भारत दौर्यादरम्यान, ब्रिटनच्या नऊ विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. इंग्लंडने म्हटले आहे की या निर्णयाचा उद्देश म्हणजे ब्रिटनच्या उच्च शिक्षण क्षेत्राचा भारतात विस्तार करणे! खुद्द इंग्लंडचे शिक्षण मंत्रालय म्हणते की, हा ब्रिटिश उच्च शिक्षण क्षेत्राचा ‘निर्यात’ विस्तार आहे आणि यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फायदा होऊ शकेल!
सध्या शिक्षणविषयक बातम्या म्हणजे शिक्षणाच्या बाजाराच्या बातम्या. शिक्षण खुलेआम बाजारात उतरले आहे. केजीपासून ते पीजीपर्यंत या बाजाराचा आवाका प्रचंड वाढू लागला आहे.
मला आठवतं. आम्ही शाळेत असताना ‘कोचिंग क्लास’ नावाची गोष्ट नुकतीच आली होती. छोट्या गावांमध्ये कोचिंग क्लासेस दिसू लागले होते. साधारणपणे दहावी आणि बारावी या वर्गांसाठी कोचिंग क्लासेस असत. मात्र, तेव्हा ते अपरिहार्य नव्हते. माझ्यासारखे अनेकजण क्लासकडे कधी फिरकले नाहीत. त्यानंतर मात्र कोचिंग क्लासेसचे महत्त्व भयंकर वाढत गेले. ‘लातूर पॅटर्न’ वगैरे प्रकरण एवढे फोफावले की, तिथे गॅंगवॉरप्रमाणे कोचिंग क्लासेसवाल्यांमध्ये टोळीयुद्ध भडकले. आता तर ‘कोचिंग क्लासेस’वालेच कॉलेज चालवू लागले आहेत. कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे खासगी विद्यापीठे सर्वदूर उभी राहिली आहेत. देश-विदेशातल्या हव्या त्या पदव्या पैसे मोजून मिळू लागल्या आहेत. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सगळीकडे बाजार आहे. मोठमोठ्या खासगी कंपन्या शाळा चालवतात. विद्यापीठे चालवतात. आता हे सार्वत्रिक होत जाणार आहे.
एक पालक मला परवा सांगत होते. "हल्ली तरूणांमध्ये व्यसनाधीनता फार वाढत चालली आहे. त्यामुळे मी मुलासाठी भरपूर पैसे देऊन चांगले कॉलेज निवडले आहे." मग माझ्या लक्षात आले. गुटखा कंपनीचे मालक आता विद्यापीठही चालवतात. त्या विद्यापीठात यांचा मुलगा शिकतो!
तुम्ही कुठलीही डिग्री सांगा. पैसे भरून सहजपणे ती मिळू शकेल, अशी व्यवस्था आज आहे. भारतातल्याच काय, परदेशातल्या अनेक विद्यापीठांच्या पदव्यासुद्धा पैसे भरून मिळू शकतात. शाळा-महाविद्यालयांमध्ये सर्व काही उपलब्ध आहे. शिक्षण मात्र नाही.
सातवीतली मुलं आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करताना दिसतात. या प्रवेश परीक्षांनी वेगळाच बाजार उघडला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी प्रवेश परीक्षा. त्या प्रवेश परीक्षेसाठी अर्थातच मेरिट लिस्ट. त्यासाठीचे कोचिंग क्लासेस. आपल्या मुलाला आयआयटीला प्रवेश मिळाला पाहिजे, असं पालकांना वाटत असतं. पण मुलाला काय हवंय अथवा मुलीला काय करायचं आहे, हे कोणीच विचारत नाही. त्या अडनिड्या वयात मुलांनाही आपल्याला काय हवंय, ते कधी समजत नाही. बरं! ‘आयआयटी’ करून ही पोरं काय दिवे लावतात? ‘आयआयटी’ प्रवेश परीक्षेसाठीच्या कोचिंग क्लासचा सगळ्यात मोठा बाजार आहे, राजस्थानातल्या कोटा नावाच्या शहरात. मागे एका पत्रकाराने तिथला ग्राउंड रिपोर्ट केला होता. या कोटामध्ये आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड आहे. आपल्याला प्रवेश मिळणार नाही, म्हणून काही मुलं आत्महत्या करतात. आयआयटीला प्रवेश मिळाल्यानंतर काही मुलं आत्महत्या करतात. पुण्यातल्या बी.जे. मेडिकल कॉलेजात दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आपल्याकडे जे तथाकथित टॅलेंट आहे, असं आपण कायम म्हणत असतो, ते टॅलेंट काय करतं, हा आणखी वेगळाच प्रश्न. म्हणजे, एच-वनबी व्हिसा अमेरिकेने महागडा केल्यानंतर सर्वाधिक अश्रू भारताने ढाळले. कारण, सर्वाधिक व्हिसा भारतीय मुलं घेतात. आता एवढी मुलं अमेरिकेत जाऊन करतात काय? सिलिकॉन व्हॅलीत जाऊन त्यांना भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळतात. ही मुलं इकडे शिकली, त्याचा आणि ते करत असलेल्या कामाचा, काही संबंध असतोच, असं नाही. किंबहुना बहुतेक वेळा नसतोच. काहीतरी टेक्निकल काम ही मुलं करत असतात. पण, ‘इनोव्हेशन’ म्हणून या सगळ्यांचे योगदान काय आहे? असे कुठले नवीन वैज्ञानिक शोध या मुलांनी लावले? मुळात नवीन शोध लावण्यासाठी, ज्या विज्ञानाचे अध्ययन करायला हवे, त्या विज्ञानाच्या शाखांना विद्यार्थीच मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. भौतिकशास्त्र हे मूलभूत विज्ञान किंवा गणित, या विषयांना सध्या विद्यार्थीच मिळत नाहीत. विद्यार्थी मिळाले तर प्राध्यापक नसतात. अशा स्थितीमध्ये आपली मुलं कुठलं मूलभूत संशोधन करणार आहेत? सुरुवातीला आयआयटी, जेइइ-नीट, इंजिनिअरिंग असे काहीतरी पर्याय शिक्षणासाठी असतात. त्यानंतर यूपीएससी आणि एमपीएससी नावाच्या मार्केटमध्ये मुलं सापडतात. इंजिनिअरिंग आणि आयआयटी केल्यानंतरही अनेकजण या स्पर्धा परीक्षांच्या नादाला लागतात. लाखो मुले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्याचे कोचिंग क्लासेस, त्याच्या अभ्यासिका, त्यासाठी मुलांना आवश्यक असणाऱ्या खोल्या, वसतिगृहे, मेस, पुस्तके-स्टेशनरी असं भयंकर जग उभे राहिलेलं आहे. एकीकडे सरकारी जागाच आक्रसलेल्या आहेत. मागच्या दाराने सरकारी सेवेमध्ये लोकांना घेतलं जाऊ लागलं आहे. आणि, अशावेळी या बाजारामध्ये येणाऱ्यांची संख्या मात्र प्रचंड वाढू लागलेली आहे.
हा बाजार तुमच्या जन्मापासून सुरू होतो. तुम्ही गर्भात असल्यापासून तो सुरू होतो. आता तर गर्भधारणेपासून! बाळंतपणात कशी काळजी घ्यावी, इथपासून ते गर्भसंस्कारापर्यंत बाजार तुमच्या मागे लागतो. त्यानंतर बाळंतपण नॉर्मल होणे हीच ॲबनॉर्मल गोष्ट. अशा बाळंतीण बाईची काळजी बाजार कशा पद्धतीने घेतो, हे पुण्यातल्या एका खासगी हॉस्पिटलने नुकतेच चव्हाट्यावर आणले. त्यानंतर मग बाळाच्या संगोपनाच्या नावाखाली बाजार सुरू होतो. मग मुलांच्या केजीतील ॲडमिशनपासून जे सुरू होतं, ते थांबतच नाही. जिथे 'केजी'ची फी दोन-दोन लाख रुपये असते, तिथे पुढे काय होणार आहे?
या सगळ्या गदारोळात एक काळजी मात्र घेतली जाते. तुमची मुलं वाटेल ते होतील, पण ती विचार करणार नाहीत. त्यांनी विचार करू नये. त्यांनी कुठलाही प्रश्न विचारू नये, अशी व्यवस्था उभी केली जाते. शेजारच्या अपार्टमेंटचे नाव ‘रिव्हर व्ह्यू अपार्टमेंट’ आहे, पण मग इथली ‘रिव्हर’ गेली कुठे, असा प्रश्न मुलांना पडत नाही. इतके दिवस झाले महानगरपालिका निवडणूक अथवा जिल्हा परिषद निवडणूक का होत नाही, असा प्रश्न या मुलांना पडत नाही. आपल्या खिडकीतून दिसणारे झाड कुठले आहे, हे मुलांना माहीत नसते. घरातल्या नळाची धार कमी झाली, तर काय करायचे, हे त्यांना समजत नसते. कोणाला चार ओळींचे पत्र लिहिता येणे शक्य नसते. काही वाच असं म्हटलं, तर मराठी अवघड वाटते, पण इंग्रजीमध्येही काही तीर मारता येत नसतात. एवढं सगळं करून आपण जे शिकलो, त्यातही काही गती नसते. भरमसाठ मार्क्स घेऊन आणि अमाप पैसा खर्च करून जे काही ही मुलं शिकतात, ते नक्की काय शिकतात, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती.
एवढं करून ही मुलं परदेशी जातात. तिथं नक्की काय करतात? मी पूर्वी कोथरूडला राहत होतो. माझ्या शेजारी एक वृद्ध गृहस्थ राहात होते. जोडपं होतं. एकुलता एक मुलगा अमेरिकेत. त्या बाई गेल्या, तेव्हाही येणं त्या मुलाला शक्य नाही झालं. एके दिवशी हे आजोबा मला सांगत होते. “मुलाला शिकवलं. मोठं केलं. तो अमेरिकेत चांगलं आयुष्य जगतोय, पण आई गेल्यानंतर सुद्धा त्याला यावंसं वाटलं नाही. हिच्या बाळंतपणासाठी तिची सासू अमेरिकेत गेली. ती मेल्यानंतर तिच्या अंत्यदर्शनाला यावं, असं सुनेला वाटलं नाही.” मी त्यांचं सांत्वन केलं.
असं खरंच का घडतं? या देशात विचार करणारं शिक्षण मिळत नाही. तुम्हाला संवेदनशील करणारं बालपण मिळत नाही. जन्मल्यापासून जिथे तुम्हाला बाजारात उभं केलं जातं, तिथे बाजाराशिवाय कुठली भाषा तुम्हाला कळणार आहे? दुसरं असं की, हाच मुलगा लहानपणी वडिलांना येऊन सांगत असेल, “बाबा, बघा ना. त्या शेजारच्या अन्वरला पुस्तक घ्यायला पैसे नाहीत.” तेव्हा कदाचित हेच सांगत असतील, “तुला इतरांचं काय करायचंय? तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे.” आपण आणि आपलं कुटुंब याशिवाय आपल्याला जगाचं काही पडलेलं नाही, हे तुम्हीच त्याला शिकवता. तो मोठा होतो आणि आपल्या कुटुंबापुरतं बघतो. तेव्हा कदाचित त्या कुटुंबात तुम्हीही नसता. तुम्हीही परके असता.
एक लक्षात ठेवा. मुलं ते कधीच करत नाहीत, जे तुम्ही सांगता. मुलं ते करतात, जे तुम्ही करता. संवेदनशीलतेच्या अनुषंगाने तुमची इयत्ता कुठली? कोणाला जखम झाल्यावर तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं का? मुलं ते शिकतात आणि मोठे होतात.
आणि मुळात, त्यांना जे हवं, ते तुम्ही कधी करूच देत नाही. मग जे आयुष्य पदरी पडलं, तिथं हे पाट्या टाकत राहतात. परवा एका फाईव्ह स्टार हॉटेलचा मुख्य शेफ भेटला. तो सांगत होता. वीस वर्षांपूर्वी मी जेव्हा घरच्यांना सांगितलं, मला शेफ व्हायचंय, तेव्हा दोन दिवस आईने अन्न-पाणी सोडले. एवढ्या चांगल्या घरातला मुलगा. आई डॉक्टर. वडील प्राध्यापक. तो स्वयंपाकी होणार! याचा त्यांना भयंकर त्रास झाला. त्यांच्या त्या त्रासाला न जुमानता मी मला हवे तेच केले. आज मी अत्यंत आनंदी आहे. आणि, माझ्याहूनही माझे आई-वडील समाधानी आहेत. अर्थात, इतर अनेक मित्र-मैत्रिणींना हे शक्य झाले नाही. त्यांचे पुढे काय झाले, त्या करूण कहाण्याही तो सांगत होता.
आपण सगळ्यांचा बाजार मांडला आहे. सगळ्यात वाईट म्हणजे, आपल्याच मुला-नातवंडांना आपण बाजारात उभे करतो आहोत. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या बकाल शाळा आणि गलेलठ्ठ सुजलेल्या खासगी शाळा हे आजचे चित्र आहे.
तुमची मुलं तुम्ही वाढवत नाही. तुमची मुलं आता शाळाही घडवत नाहीत. आता बाजार त्यांचं पॅकेजिंग करतो. ती मुलंही मग पॅकेजच्या भाषेत बोलू लागतात!
या सगळ्या वर्तमानाचाही सुटा-सुटा नाही, पॅकेज म्हणूनच विचार करावा लागणार आहे. नाहीतर, अनर्थ अटळ आहे.
👇 *GROUP add* 👇
*`राज्यस्तरीय महागृप`*
https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*`सौजन्य व संकलन`*
*--🇷🇲🇩🅿️🅿️--*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
- संजय आवटे
(पुण्यात बोलताना...)
Comments
Post a Comment