कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व

 *भेट*





▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

नेहमीप्रमाणे पायात चपला सरकवल्या त्याने. दरवाजा वाजवीपेक्षा जरा जोराने ढकलत तो, एक - एक पायरी वगळत जिने ऊतरला. गेटही घुश्शातच उघडून... ते परत न लोटताच, तडा तडा निघून गेला तो. त्यांच्या गॅलरीतून तिने बघितलं त्याला, तिच्या नजरेआड होईपर्यंत... आणि सोफ्यावर धाड्डकन अंग टाकून दिलं तिने. 


सागरचं हे ठरलेलंच होतं... वाद विवाद आपली रेषा ओलांडून, आता भांडणाच्या हद्दीत घुसू पाहतायत हे जेव्हा लक्षात येई त्याच्या... तो असाच तडक घराबाहेर पडत असे. कारण भांडणा जोडीनेच सईच्या डोळ्यांतून, गंगा - जमुना वाहणंही सुरु होत असे... ज्याचा त्याला मनःस्वी तिटकारा होता. सईचं रडणं तो अजिबात सहन करु शकत नसे... आणि चिडचीड वाढे त्याची आणखीनच. मग आणिकच अद्वातद्वा बोलायला लागे तो... अन् सई अजून जोरात रडू लागे. 'व्हिशिअस सर्कल' होत असे मग ते, ज्यातून बाहेर पडणं अशक्य होई सागरला. 


अशा बर्‍याच धुमःश्चक्रींनंतर हा उपाय शोधून काढला होता सागरने... सरळ घराबाहेर पडायचा. पहिल्यावेळेस सागर जेव्हा असा घराबाहेर पडला होता... त्याला बराचवेळ कळेचना, की नेमकं जायचं कुठे? आणि अचानक ट्रेनचा हाॅर्न ऐकू आला त्याला. 'गाडी बुला रही है.. सिटी बजा रही है' ह्या मनात आलेल्या गाण्याच्या चालीवरच, त्याची पावलं स्टेशनकडे वळली होती मग. कामावर कार ने ये - जा करणार्‍या... नी जवळपास जाण्यासाठी बाईक काढणार्‍या सागरचा, अगदीच क्वचित संबध येई स्टेशनशी. त्यामुळे तो पर्याय त्याला आवडला होता. मस्त दोन तास स्टेशनच्या बाकावर विनाकारण बसला होता तो... ती रविवारच्या संध्याकाळची, आजुबाजूची तुरळक गर्दी वाचत. त्यानंतर मग प्रत्येक भांडणावेळी सागर, स्टेशनवरच जाऊन बसे. 


आजही आला तो स्टेशनवर. सात - आठ मिनिटं लागली त्याला... त्या घरी सोडून आलेल्या भांडणातून, कंप्लिटली बाहेर यायला. आता त्याने त्याच्या मनाचा दरवाजा, त्या भांडणाच्या तोंडावर आपटत बंद केला... आणि वळत उभा राहिला बंद डोळ्यांनी, दरवाज्याला पाठ टेकून. हळूहळू डोळे उघडले त्याने... आणि त्याला भान येऊ लागलं, आजुबाजूला काय चाल्लय त्याचं. पण खरंतर आजुबाजूला कुठे काय चाल्लेलं? पुर्ण रिकामं होतं स्टेशन... अगदी स्वच्छ पुसलेल्या त्याच्या लहानपणच्या, त्या दगडी पाटीसारखं. लहानपणचं मोरपीस पुन्हा हुळहुळलं अवेळी, त्याच्या मनावरुन. सागरला अचानक आठवलं, लाॅकडाउनमुळे ट्रेन्स बंद असल्याचं. गर्दी वाचायचा त्याचा आवडता छंद, त्याला आज जोपासता येणार नव्हता... आणि या विचाराने दुःखी झाला तो. गर्दीशिवायचं ते स्टेशन त्याला... एखाद्या बाईच्या कुंकू, टिकली नसलेल्या... भुंड्या कपाळासारखंही वाटलं होतं. 


आणि तितक्यात त्याचं लक्ष गेलं, त्याच्या शेजारच्या बाकावर बसलेल्या एका पुरुष अन् स्त्री कडे. सागरला प्रश्न पडला की, ट्रेन्स बंद असतांना हे जोडीने काय करतायत स्टेशनवर? तो चोरट्या नजरेनी बघू लागला, त्या दोघांकडे. साधारण पन्नाशीचा असणारा तो माणूस, काहीतरी सांगत होता त्याच्या बरोबर असलेल्या बाईला. त्याचा आवाज फक्त पोहचत होता सागरच्या कानांवर, पण त्या आवाजाला शब्दांचा साज नव्हता... कारण शब्द एकही कळत नव्हता सागरला. एखाद्या गडूत डगड भरुन... तो गडू हलवल्यावर येणार्‍या आवाजासारखाच, निरर्थक होता तो आवाज. पण सागरला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की... त्या पुरुषाच्या शेजारी बसलेल्या बाईच्या कानावर तरी, त्याचं बोलणं जात होतं की नाही? कारण तो माणूस जेवढ्या तळमळीने बोलत होता, तेवढीच स्थितप्रज्ञ होती ती बाई... अगदी निश्चल, भावनारहीत. बसल्यावर आपण बाजूला बॅग ठेवून, ती धरुन बसतो... अगदी तशीच निर्जिव वाटली सागरला, खांद्यावर त्या माणसाचा हात असलेली ती बाई. तो माणूस मध्येच उठला नी चालत ट्रॅक्सजवळ गेला... आणि ते ट्रॅक्स दाखवत तो त्या बाईला, काही सांगू लागला. पुन्हा जवळ आला... गुडघ्यांवर हात ठेवत तिच्या, खाली पायाशी बसला... तिच्याकडे काकुळतीला येऊन बघत. पण ती बाई ढिम्म होती... मघापासून एका  ठिकाणीच बघत होती, दगडासारखी बसून. अचानक उठली ती जागेवरुन... आणि यंत्रवत चालत, स्टेशनच्या बाहेर गेली ती. 


तो माणूस उठून पुन्हा बाकावर बसला. चश्मा काढत डोळ्यांवरुन, शर्टाच्या बाहीने डोळे पुसले त्याने. पुन्हा चश्मा घालतांनाच त्याचं सागरकडे लक्ष गेलं. सागर पटकन मान वळवत, दुसरीकडे बघू लागला... आणि डोळ्यांच्या कोपर्‍यांतून दिसलं सागरला की, तो माणूस आता त्याच्या बाकाजवळ आलेला.


--एक्स्क्युज मी प्लिज


--येस प्लिज


--तुम्ही सागर सबनीस राईट?


--तुम्ही मला ओळखता?


--आॅफकोर्स... तुम्ही मघापासून आमच्यात काय चाल्लय ते ऐकायचा प्रयत्न करत होतात... पण काही केल्या समजत नव्हतं तुम्हाला... बरोबर ना?


--अहो नाही... आय वाॅज जस्ट वन्डरींग की, ट्रेन्स बंद आहेत तर मग हे ईथे काय करतायत?... आय मिन... खरंच माफ करा... पण तुमचं बोलणं चोरुन वैगरे... आय मिन...


--ईट्स अब्सोल्युटली फाईन  मिस्टर सागर... अहो त्यात काय... आणि माझी अजिबात तक्रारही नाहीये अहो त्याबद्दल... उलटपक्षी मी तुम्हाला आपणहून सांगायला आलोय... जे तुम्ही ऐकायचा प्रयत्न करत होता...


--अहो... नाही नाही... तुमचा गैर...


--ईट्स ओके मिस्टर सागर... बरं ऐका... मी माझ्या बायकोला आज तो घडलेला प्रसंग सांगत होतो... अगदी ईत्यंभूत... सविस्तर... वर्णनासहीत... पण काहीच उपयोग झाला नाही... आजही एक नदी कोरड्यानेच वाहिली... जमलेल्या बर्फाखालून... बाहेर अजिबातच झिरपू न देता, साधा ओलावाही... 


--मला अॅक्चुअली नाही कळलं...


--लेट मी एक्स्प्लेन... आमच्या लग्नाला विस वर्ष झाली... अगदी दिवसाआड भांडतो आम्ही... रादर भांडत होतो... गेल्या महिन्यापर्यंत... भांडण सुरु होऊन पाच मिनिटं नाही झाली, की ही रडायला लागायची... ही रडायला लागली की, माझं टाळकं आणिक सटकायचंं... मग आणखीन वाढायचं भांडण... वैताग आलेला स्साला हिच्या त्या रडण्याचा... देवाकडे प्रार्थना करायचो की, बाबा हिच्या डोळ्यांतून पाणी आटू दे कायमचं... आणि गेल्या महिन्यात देव बोलला की 'तथास्तू'... रडलीच नाहिये ती गेला अख्खा महिना... अगदी आमच्या अठरा वर्षांच्या मुलाच्या... ट्रेनखाली येऊन छीन्न विछीन्न झालेल्या देहावरही... डाॅक्टर म्हणालेत ह्यांना रडावं लागेल लवकरात लवकर... नाहितर जिवाला धोका आहे ह्यांच्या... म्हणूनच गेले दोन आठवडे, मी रोज स्टेशनवर घेऊन येतो हिला... आणि कल्पनेनेच नॅरेट करतो, तो अॅक्सिडंट झालेला आमच्या एकुलत्या एक लेकाचा... पण अजूनपर्यंत तरी यश आलेलं नाहीये प्रयत्नांना...


--ओह! अॅम सो साॅरी...


--डोन्ट बी साॅरी... रादर डोन्ट फिल साॅरी फाॅर मी... थिंक आॅफ युवरसेल्फ... 


--म्हणजे... आय डोन्ट गेट यू


तुम्हालाही आवडत नाही ना, तुमच्या मिसेसच्या डोळ्यांत पाणी आलेलं... तुमचाही पारा चढतो ना, त्यांच्या डोळ्यांतलं पाणी बघून... बायकांची अपेक्षा असते, त्यांच्या डोळ्यांतील पाण्यात आपण विरघळावं... त्यांना जवळ घ्यावं... पण स्साला आपण नेमकं उलट वागतो... आणिक संतापतो... आणखीन लांब जातो... मी हेच केलं... तुम्हीही तेच करताय... नका करु असं... नमतं घेण्यात ईगो आड येत असेल, तर बायकोवर रडायची वेळच आणू नका... पण जर का ती रडलीच... तर किंमत करा त्या अश्रूंची... महत्व द्या त्या अश्रूंना... तुमचे दोन समजुतीचे शब्द... नी एक प्रेमाची मिठी... बस्स... खरंतर ईतकेच महाग असतात ते... नाहितर मग असं काहितरी घडून, आयुष्यभराकरता महाग होतील हे अश्रू... त्यांच्या डोळ्यांना अन् तुमच्या मनाला... खूप जास्त ओझं असतं बरं हे, त्या आटलेल्या काही थेंबांचं... येतो मी... मी तुम्हाला कसा ओळखतो, हे येईलच लक्षात तुमच्या काही वेळांत... आणि हो... रिमेम्बर वन थींग... ईट ईज जस्ट अ वाॅर्निंग बेल...आॅर अ वेक-अप काॅल यू मे से... यू कॅन स्टिल चेंज युवर फ्युचर.


--मी लक्षात ठेवेन... पण... मे आय नो युवर गुड नेम प्लिज...


--मी? मी सागर... सागर सबनीस... आणि ती माझी मिसेस होती... सई सबनीस... सिविअरली डिप्रेस्ड पेशंट... हू हॅज गाॅन बियाँड विपींग, अँड सेटल्ड ईन टू अ 'क्राय - प्रुफ' स्टेट.


तो वयस्कर माणूस मोठा सुस्कारा सोडत... गालातल्या गालात हसत... सागरकडे पाठ करुन, स्टेशन बाहेर चालू पडला. मघापासून फारच ओळखीचा वाटणारा त्याचा चेहरा, सागरला आत्ता कळलेला. ते पिकलेले उलटे फिरवलेले केस... ती पिकलेली दाढीची खुंट... ती बसलेली गालफडं... तो जाड्या काळ्या बाॅर्डरचा चश्मा... सगळच न ओळखू येण्यासारखंच. पण ते शेवटचं त्याचं गालातलं हसणं... आणि ती किंचितशी पडणारी खळी? सेम टू सेम... येस्स... हा सागरच तर होता... अठरा वर्षांनंतरचा सागर सबनीस. 


--म्हणजे माझं ही असंच?.... माझाही मुलगा असाच??... नो नो... तो म्हणून गेलाय की, आय स्टील कॅन चेंज माय फ्युचर.

.

.

.

दाराची वाजलेली लांबलचक बेल ऐकून, सईने धावत पळतच दरवाजा ऊघडला. सागरला पाहून तिला आश्चर्यच वाटलं... आणि ती त्याला काही विचारणार तोच, सागरने मिठीत घेतलं सईला. लगेच धावला तो त्यांच्या सहा महिन्यांच्या लेकाकडे... जो झोपला होता पाळण्यात शांतपणे. त्याने ऊचलून घेतलं लेकाला, नी घट्ट लावलं छातीशी. सईला जवळ बोलवत... तिलाही कवटाळून घेतलं सागरने. सईच्या डोळ्यांतील अश्रू, सागरच्या छातीवर ओघळले होते... अगदी हृदयावरच. गेल्या दोन वर्षांत आज पहिल्यांदाच, खर्‍या अर्थाने 'भेट' झाली होती सागरची सईशी... एका रिकाम्या स्टेशनवर त्याला भेटलेल्या, त्याच्याच मुळे.


*---सचिन श देशपांडे*

 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Comments

Popular posts from this blog

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर ..

अखेरचा हा तुला दंडवत

एक वृक्ष - कविता