!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - १.
गणपतराव इनामदार जोशी आपल्या जुन्या वाड्यात सोप्यातील मोठ्या झोपाळ्यावर चिंताग्रस्त बसले होते. एकेकाळी सर्व वैभव होतं. इनामदारी होती. नौकर चाकर, गडी माणसांनी वाडा भरलेला होता. पण आता जशी वाड्याची दूरर्दशा झाली तशीच त्यांचीही झाली. तेवढ्यात सोमणशास्री आले. त्यांना बसायला सांगून विचारलं, शास्त्रीजी, आज कसे काय आलात? शास्त्री म्हणाले, आपण सांगितल्यानुसार काल ठाण्याला जाऊन मुलगा पाहून आलो. बीजवर आहे. वय २५ च्या पुढे असावे. ठाण्यात पोस्टात कायमची नोकरी आहे. घरदार, शेती वगैरे नाही. मुलाचे नाव गोपाळराव आहे.
गणपतरावांच्या पत्नीने हरकत घेतल्यावर, ते म्हणाले, बिजवर आहे म्हणून काय झाले? मी नव्हतो बिजवर? शिवाय एक मुलगाही होता. तरी आपला संसार झालाच ना? आणि घर, शेतीच म्हणाल तर, मुलाला कायम नोकरीत आहे. आपली यमु उपाशी राहणार नाही. शास्त्री म्हणाले सरकारी चाकरी आहे. मुलाचा स्वभाव चांगला आहे. दोघांच्याही पत्रिका जुळतात. योग उत्तम आहे. ठीक आहे. मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून टाकू. मुलाला घेऊन या.
सोमणशास्री आपल्या सोबत गंगाधर शास्त्रींना घेऊन मुलाकडे गेले. दिवस सुट्टीचा होता. गोपाळराव एका वाड्याच्या माडीवर हात होते. हे दोघे त्यांच्याकडे गेले तेव्हा, ते कोपऱ्यातल्या चुलीवर स्वयंपाक करीत होते. त्यांना बसायला सतरंजी टाकली. दोघेही स्थानापन्न झाले. सोमणशास्री म्हणाले, आपल्यासाठी मुलगी सांगून आलोय! कल्याणच्या गणपतराव इनामदारांची नऊ वर्षाची मुलगी आहे. अंगकाठीने थोराड आहे. मुलगी बाळबोध घराण्यातील आहे. गोपाळराव म्हणाले, मला बाळबोघ घराण नको. मुलीला बाळबोध वाचायला यायला हवं.
मला घराण्याशी काही देणंघेणं नाही. पण तिला लिहिता वाचता यायला हवं. माझी ही अट आहे. सोमणशास्त्री म्हणाले, लिहिणाऱ्या वाचणाऱ्या अगोचर बायका आपल्यात नाही. मग अगदी हळु आवाजात कुणी ऐकणार नाही या बेताने म्हणाले, या मुलीला उत्तम वाचता येते. मग मुलगी बघायला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी येण्याचा वायदा करून सोमण शास्त्री व गंगाधर शास्त्री गोपाळरावांच्या घरातून बाहेर पडले.
चालतां चालतां गंगाधर शास्त्री म्हणाले, सोमणजी हा मुलगा मला ठीक वाटत नाही. गावात त्याला कोणी चांगला म्हणत नाही. कुणी त्याच्याकडे येत नाही. काय त्याचे ते घर? हाताने स्वयंपाक करत होता. सोवळ ओवळ काही नाही. गळ्यात जाणवं होतं म्हणूनच त्याला ब्राह्मण समजायचे. त्याची उठ बस किरिस्तावांकडे असते. मोठ-मोठे इंग्रजी पुस्तके वाचतो. बायकोला शिकवायचं म्हणतो. आपल्यासारख्या कुलवंत घरात असं कधी ऐकलं आहे का? तुम्ही हे सगळं गणपतरावांच्या कानावर घाला. तुम्ही त्यांना फसवले असं व्हायला नको.
त्यांना म्हणावं, आपली मुलगी एवढी वर आली नाही. हवं तर तिला विहिरीत लोटा. पण यां नरकात ढकलू नका. सोमणशास्त्रींनी त्यांचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशी सोमणशास्त्री गणपतरावांकडे आले. आणि काहीही न लपवतात सविस्तर सर्व सांगितले. घरातल्या सर्वांनी ऐकलं. स्थळ कुणालाच पसंत नव्हते. दुसर पणाच, वयाचे काही विशेष नाही. पण त्यांचे पाद्री लोकांकडे जाणे येणे, ब्राह्मणाशी फटकून वागणे, घरात धर्मकार्य न करणे, संध्या तरी करतो की नाही माहित नाही. शिवाय चमत्कारिक स्वभाव अशा माणसाशी संसार कसा नीट होणार? गुंतून कशी राहणार? बरीच चर्चा झाली. पण होकार देण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मुलगी वयाने वाढली होती. नाव मोठं. पण घरात काही नव्हते. घराणे इनामदाराचे. पण रोजचे व्यवहार चालवणे मुश्किल होते. जो आणि जसा मुलगा मिळेल त्याच्या पदरात मुलगी टाकणे भाग होते.
दुसऱ्या दिवशी दुपारी गोपाळराव सोमणशास्री बरोबर कल्याणला आले. इनामदारांचे शेजारी कानिटकर यांच्या घरी मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम ठरला. सोमणभटजी काही बोलत होते. गोपाळराव नुसते हुृंऽ हुंऽ करत होते. ओठातल्या ओठात हसत होते. ते कानिटकरांना आवडले नाही. त्यांना वाटले, आज जोशींची परिस्थिती खालावली म्हणून मुलगा असा हसण्याचे धाडस करीत आहे. पूर्वी याच वाड्यात हत्ती, घोडे डुलत होते. दास दासी सेवेला तत्पर होत्या. देवडीवर पालखीचा सरंजाम होता. त्यावेळी एकटा मुलगा मुलीला पाहायला आला असता का?
थोड्या वेळाने यमु खाली मान घालून हलक्या पावलाने बाहेर आली. गोपाळरावांनी काहीच विचारले नाही. नुसते हसत होते. त्यांच्यावतीने मुलीला विचारतात तेच नेहमीचे प्रश्न सोमणभटजींनी विचारले. गोपाळराव जायला निघाले, तेव्हा सोमण.भटजींनी विचारले, विचारायला कधी येऊ? यायची गरज नाही. मुलगी पसंत आहे. तुम्ही आला नाही तर मी तुम्हाला पसंत नाही असे समजेन त्यांचा मुक्काम कल्याणला पोस्टमास्तर कडे होता.
संध्याकाळी सोमणशास्री व कानिटकर गोपाळरावांकडे गेले. गोपाळराव बाहेरच्या खोलीत इंग्रजी पुस्तक वाचत होते. त्यांना पाहून पुस्तक बाजूला ठेवले. मोठ्याने हसत म्हणाले, म्हणजे, तुम्हाला मी पसंत आहे तर?
कानिटकर म्हणाले, मुलीकडच्यांना पसंती नसते. मुलाला मुलगी पसंत पडायला हवी. पुढची बोलणी करायला वडिलांना बोलवायचे ना? गोपाळराव म्हणाले मी दुपारीच सांगितले, लग्न मला करायचे आहे. अहोऽ पण, चार माणसे बोलणी करायला हवीत ना? तुम्ही आहातच की चार माणसे! कृपया आपण असं तिढ्याने बोलू नका. गोपाळरावांचे असे तिरसट बोलणे ऐकून, पोस्टमास्तर म्हणाले, गोपाळराव जरा चार चौघांसारखी वागा. ठीक आहे. या तुम्ही ठाण्याला.
सोमणभटजींनी लगेच पंचांग काढले. म्हणाले. पुढच्या आठवड्यात सोमवारी येऊ. गोपाळरावांनी मान हलवली.
गोपाळरावांना ठाण्याला घरी पोहोचायला बरीच रात्र झाली होती. स्टेशनवरून झपाझप पावले टाकीत घरी आले. त्यांच्या नजरेसमोर नऊ वर्षाची लुगडाचा भोंगा झालेली यमु दिसत होती. आपली पहिली पत्नी सावित्रीची आठवण आली. शिकवायला बसवले की रडायला लागायची. थोडे शिकली. लवकर गेली नसती तर शिकली असती का?
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.

Comments
Post a Comment