!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!






                    भाग - २.

                  गोपाळराव कल्याणहून आपल्या ठाण्याच्या घरी पोहोचले. दार उघडले तर दरवाज्यात घरून संगमनेरहून आलेले पत्र होते. नेहमीचेच उपदेश, लग्नाबद्दल असेल असे वाटून न वाचताच त्यांनी तसेच ठेवून दिले. खरं म्हणजे त्यांना दुसऱ्याच पत्राची अपेक्षा होती. पुण्यातील परशुरामशास्त्री पंडित विधवा विवाह जमवतात असे ऐकून होते. म्हणून गोपाळरावांनी त्यांना लिहिले होते... मला विधवा विवाह करायची इच्छा आहे. ती विधवा कोणत्याही जातीची कुळशील, घरंदाज नसली, तिचा पाय घसरलेला, एखादे मूलबाळ असले तरी चालेल. पण तिची लिहिण्या वाचण्याची तयारी असावी. नवरा म्हणून तिच्याकडून मला काही नको. पुण्यात सुधारक तर खूप आहेत. पण प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की माघार घेतात. मला एवढेच दाखवायचे आहे की, पुरुषांप्रमाणे बाईही लिहू वाचू शकते. पण आज पंधरा दिवस झाले तरी त्यांचे कडून उत्तर आले नव्हते.

           गोपाळरावांनी अंथरुणावर अंग टाकलं. पण झोप येत नव्हती. त्यांना पहिली पत्नी सावित्री आठवली. याच खोलीत तिच्याबरोबर संसार केला होता. तिला स्त्री सारखे वागवले नव्हतेच. अभ्यासाचा घोषा लावला होता. याच खोलीत तिने अखेरचा श्वास घेतला होता.

         मग त्यांनी दुपारी पाहिलेली नऊ वर्षाची यमु आठवली. छेः झोप येतच नव्हती. तशीही पहाट होत आली होती. आजुबाजूला जाग आल्याचे जाणवले. त्यांना सारखी कोवळी, अबोध यमु दिसत होती. त्यांनी यमुचे विचार झटकून टाकले. आणि पुन्हा परशुराम शास्त्री पंडितांना पत्र लिहायला घेतले....

         तुमच्या पत्राची खूप वाट पाहिली. तुम्ही विधवा विवाहाच्या जाहिराती लावून पुण्यात बसलात. वर्तमानपत्रातून, व्याख्यानातून विधवा विवाहच्या प्रोत्साहनपर भाषण देता. पण मी स्वतः तुमच्याकडे विधवा विहाची याचना करतो, माझी कुठली अट नाही. तरी तुमच्याकडून उत्तर नाही. 

     मी पोस्टात साधा कारकुन. घरदार नाही. हातावरचे पोट आहे. अशा माणसाला विधवा सुचवण्याचा संकोच वाटतो की काय? माझ्यात इतर गुण नसले तरी एक गुण नक्की आहे, मी जसे बोलतो तसेच वागतो. 

           माझी पहिली बायको मेली. नऊ वर्षाच्या कोवळ्या मुली बरोबर लग्न मला करायचे नाही. म्हणून तुम्हाला विनंती की, एखादी विधवा सुचवा. कालच एक नऊ वर्षाची मुलगी पाहून आलो. नऊ वर्षाच्या मुलीशी मी पंचशील असलेला लग्न व्हावेसे वाटत नाही. निदान त्या कोवळ्या मुलीची दया येऊ द्या. व माझ्यासाठी एखादी विधवा सुचवा. दोन-चार दिवसात उत्तर येऊ द्या.

         पत्र लिहून होईपर्यंत सकाळ झाली होती. त्यांनी सकाळची प्रातर्विधी, स्नान आटोपले. चूल पेटवून भातासाठी आधन ठेवले. रात्री न वाचलेले वडिलांचे पत्र त्यांनी वाचले. आई वडील आठवले. मन एकदम उदास झाले. डोळे भरून आले. 

         गोपाळरावांनी वडिलांना पत्र लिहायला घेतले. कल्याणची नऊ वर्षाची मुलगी पाहून आलो. वडील इनामदार. मोठा चौपसी वाडा. कर्मठ आहेत. छत्तीस गुण जुळतात असे जोतिष्याने सांगितले. मुलगी चांगली वाटली. शेवटी आपण जे ठरवाल त्याप्रमाणे होईल. आपल्या शब्दाबाहेर नाही. वगैरे बरेच लिहिले. मग त्यांचे त्यांनाच वाटले, आपले वागणे तिरसट असल्यामुळे वडिलांना आपल्यापासून कधीच सुख मिळाले नाही. या विचाराने मन अधिकच उदास झाले.

            गोपाळरावांचे ८-१० दिवस फार मनःस्तापात गेले. परशुरामशास्त्री पंडितांचे पत्र आलेच नाही. मात्र वडिलांचे पत्र आले. जोशी इनामदारांनी त्यांच्या वडिलांना संगमनेरला परस्पर पत्र दिले होते. यांचेही पत्र वडिलांना मिळाले होते. वडिलांना फार आनंद झाला. त्यांना तर अशा घरंदाज इमानदारांची कुळशीलवान मुलीशी लग्नला तयार होईल ही वडिलांना आशाच नव्हती. त्यांना वाटे पादऱ्यांच्या संगतीने मुलगा ख्रिस्ती होईल. एखाद्या विधवेशी पाट लावेल. त्यांनी पुढे लिहिले होते... वृध्दपकाळामुळे तिकडे येणे शक्य नाही. तूच बैठक घेऊन लग्नाची तिथी निश्चित करून टाक.

            गोपाळरावांना एकीकडे वाटले, आपणच कल्याणला पत्र लिहून कळवावे की, आपण लग्नाला तयार नाही. पण सोमणभटजींनी त्यांना उसंत दिली नाही. मध्ये मुहूर्तासाठी योग्य दिवस नसल्यामुळे आठ-दहा दिवस गेले एवढेच! नंतर सोमणभटजींनी गोपाळरावांची भेट घेऊन सांगितले, उद्या लग्न ठरवायला मंडळी घेऊन येतो. होकार देण्याशिवाय गोपाळकांकडे दुसरा पर्यायच नव्हता. नकार देणार तरी कसे? पुण्याच्या पंडितांचे अजूनही उत्तर आले नव्हते. कोणी विधवाच नव्हत्या की काय? विधवा हवी होती तर ती मिळत नव्हती. आणि नऊ वर्षाची मुलगी नको होती तर ती हातात माळ घेऊन उभी होती.

        सोमवारी संध्याकाळी कल्याणहून सात आठ जण, सोमणशास्री, गंगाधर शास्त्री आले होते. गोपाळकांकडून कोणीच नव्हते. तशी त्यांना कोणाची गरजही नव्हती. त्या आलेल्या लोकांची अपेक्षा होती बैठक चांगली रंगेल. घेण्या-देण्यावरून वाद-विवाद होतील. त्यांच्या या साऱ्या कल्पनेला गोपाळरावांनी एकाच वाक्याने धक्का लावला. ते म्हणाले, मला फक्त मुलगी हवी. नारळ सुद्धा नको. 

     बैठक झालीच नाही असेच सर्वांना वाटले. मुलगा प्रत्येक गोष्टीला नकारच देत गेला. हुंडा नको. मानपान नको. कसलाही पोशाख चालेल. मिरवणूक नको. जेवण घाला अगर नका घालू. सगळेच तऱ्हेवाईक विचार.

        सोमणभटजींचा लग्न ठरवण्याचा सारा उत्साहच गेला.

       मुलीचे वडील गणपतराव सद्गदीत झाले. म्हणाले, काहीही न मागता, कशाचीही अपेक्षा न धरता माझी मुलगी पदरात घेताहात. फार फार उपकार झाले.

           गोपाळराव म्हणाले, अपेक्षा नाही असं नाही. माझ्याही काही अटी आहेत. गणपतरावांनी विचारले, कसल्या अटी? पैशाशिवाय दुसऱ्या कोणत्याही अटी आम्हाला मान्य आहे. गोपाळराव म्हणाले, आता हो म्हणाल, नंतर माझ्यामागे भुनभुन लावलेली मला खपणार नाही.

         क्रमशः 

संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

Comments

Popular posts from this blog

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर ..

अखेरचा हा तुला दंडवत

एक वृक्ष - कविता